खराखुरा पँथर!

दिनांक:- २५/१२/२०२१ रोजी प्रकाशित,
आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री (राज्य) रामदास आठवलेंचा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसा निमित्त या अवलिया विषयी दोन शब्द!!

रामदास आठवलें सारख्या नेत्याला आपल्यापैकी बरेच जण सिरियसली घेत नाहीत,त्यांची ही इमेज किंवा विदूषकी प्रतिमा तयार होण्यामागे त्यांचीच वागणूक कारणीभूत आहे मग ते कोणत्याही राजकीय/अराजकीय मुद्द्यांवर चित्रविचित्र कमेंट्स करणे असो,त्यांचा विचित्र ड्रेसिंग सेन्स असो किंवा आपल्या जगप्रसिद्ध कविता करणे असो.
पण कोणी काहीही म्हणो पण मला हा माणूस जाम आवडतो आज यांना राजकीय जीवनात सार काही नशिबाने मिळत आहे असे जरी अनेकांना वाटत असले तरी या माणसाने एके काळी दलित चळवळीत खूप खस्ता खाल्ल्या आहेत, असो हा वेगळा मुद्दा आहे पण कधी कधी असे विनोदी माणसं सुद्धा जाणते अजाणतेपणी भारी काम करतात.
मागे एका छोटेखानी कार्यक्रमात किंवा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांनी कॊरोना या जागतिक महामारीच्या विरोधात सहजपणे गो कॊरोना,कॊरोना गो अशी घोषणा दिली.(या वेळेस भारतात सर्वत्र लॉक डाउन झालेले नव्हते) लोकांनी या वेळेस त्यांची मोठ्या प्रमाणावर टिंगलटवाळी केली,त्याच्यावर टिक टॉक सारख्या अँप वरून विविध व्हिडिओज बनवून त्यांची मजा घेण्यात आली, पण नंतर त्यांच्या या वाक्याला याच लोकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारून लोकांमध्ये कॊरोनाविषयी जनजागृतीसाठी याचा उपयोग केला,आणि त्याचा सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिसून आला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्या या घोषणेची दखल घेत त्यांचे कौतुक केले आणि मला यात काही चुकीचे वाटत नाही. जर त्यांच्या या घोषणेमुळे समाजात जर कॊरोनाविषयी जनजागृती होत असेल मग ती विनोदाने का असेना तर ती चांगलीच गोष्ट आहे.
आज रामदास आठवलेंना राजकारणात यशस्वी होण्यासाठी कधीच कोणत्याही प्रकारच्या जातीयवादाची किनार घ्यावी लागली नाही हेचं या माणसाचे खरे यश आहे आणि हाच रामदास आठवलें आणि इतर दलित नेत्यांमधील मुख्य मूलभूत फरक आहे!
या वाढदिवसाच्या अनुषंगाने मला एक मुद्दा मांडावासा वाटतो की, तुम्ही रामदास आठवले यांची कितीही टिंगल करा,त्यांना ट्रोल करा पण हा माणूस त्याचा स्वतः वर कधीही काहीही परिणाम करून घेत नाही आणि आपला छंद जोपासतो…हा गुण त्यांच्याकडून नक्कीच घेण्यासारखा आहे!

असो साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

Was Gandhi really a Mahatma?

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?