'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: स्त्री सक्षमीकरणाचे महानायक'
अनेक शतकांपासून परंपरा, रुढी आणि असमानतेच्या बेड्यांनी स्त्रीला जखडून ठेवले होते अशा काळात एक दूरदृष्टी असलेला नेता, समाजसुधारक आणि कायदेतज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य खरोखरच क्रांतिकारक ठरले. त्यांनी केवळ स्त्रियांच्या हक्कांबद्दल विचार मांडले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संविधान आणि कायद्याच्या माध्यमातून भक्कम पाया घातला.
"मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो"
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नागपूर महिला परिषद १९४२)
शिक्षणाचे क्रांती शस्त्र:-
बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच परिवर्तनाचे एकमेव साधन आहे. यामुळे स्त्री हक्कांच्या लढ्यात बाबासाहेबांनी महत्व दिले ते शिक्षणाला. त्यांच्या मते "शिक्षण हेच स्वातंत्र्याचे खरे शस्त्र आहे." त्यांनी महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, कारण शिक्षणाशिवाय स्त्री खऱ्या अर्थाने सशक्त होऊ शकत नाही, हे त्यांना ठाऊक होते.
त्यांनी महिलांना आवाहन केले की, जोपर्यंत तुम्ही शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या गुलामीच्या बेड्या दिसणार नाहीत. त्यांनी केवळ दलितांच्याच नव्हे, तर सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुले करण्याची मागणी केली. त्यांनी समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. केवळ बाबासाहेबांमुळेच आज भारतीय स्त्री आकाशाला गवसणी घालत आहे.
राजकीय अधिकार आणि मतदानाचा हक्क:-
मतदानाचा हक्क हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावताना स्त्री-पुरुष समानतेचा सिद्धांत घट्टपणे रुजवला. भारतीय संविधानामध्ये सर्व नागरिकांना लिंगभेद न करता मतदानाचा समान हक्क देण्यात आला.
जगातील अनेक प्रगत देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी अनेक दशके लढा द्यावा लागला, परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम १५ व १६ नुसार लिंगभेद पूर्ण नष्ट केला. प्रत्येक प्रौढ स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने मतदानाचा आणि राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार दिला. ही त्या काळातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती होती.
हिंदू कोड बिल : स्त्री मुक्तीचा जाहीरनामा:-
स्त्रियांच्या आर्थिक आणि कौटुंबिक हक्कांबाबतही बाबासाहेबांनी महत्वपूर्ण पावले उचलली. विशेषतः वारसा हक्कांच्या बाबतीत त्यांनी क्रांतिकारी बदल घडवून आणले. हिंदू कोड बिल हा त्यांच्या प्रयत्नांचा परिपाक होता. कायद्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना मालमत्तेत समान वाटा, दत्तक घेण्याचा अधिकार आणि घटस्फोटाचा कायदेशीर हक्क मिळवून दिला.
हे विधेयक मंजूर व्हावे म्हणून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावरूनच हे स्पष्ट होते की त्यांच्यासाठी सत्तेपेक्षा स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांचे मूलभूत अधिकार अधिक महत्वाचे होते. बाबासाहेबांमुळे स्त्रीच्या जीवनातील स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाला नवी दिशा मिळाली. आज जे हिंदू महिलांना वारसा हक्क मिळतात, याचे संपूर्ण श्रेय बाबासाहेबांनाच जाते.
श्रम आणि मातृत्व लाभ:-
कामगार मंत्री म्हणून कार्यरत असताना बाबासाहेबांनी महिला कामगारांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांनी महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, समान वेतन आणि योग्य कामाचे तास यांसाठी कायदे केले. त्यांनी महिलांना खाणींमध्ये काम करण्यापासून रोखले आणि त्यांच्या कामाचे तास निश्चित केले.
सर्वात महत्वाचे म्हणजे, 'मातृत्व लाभ विधेयक' आणून गरोदर महिलांना भरपगारी रजा आणि आर्थिक मदत मिळवून दिली. या विधेयकाच्या माध्यमातून गर्भवती महिलांना विशेष सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. बाबासाहेबांच्या या धोरणामुळे महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळाले. आज ज्या सवलती नोकरी करणाऱ्या महिलांना मिळतात, त्याचा पाया बाबासाहेबांनी रचला होता.
निष्कर्ष
बाबासाहेबांनी महिलांच्या सामाजिक सन्मानासाठीही सातत्याने संघर्ष केला. त्यांनी स्त्रियांना केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या आधुनिक विचारांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी शिक्षण, नोकरी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात आपली छाप पाडली.
त्यांच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांनी स्त्री-पुरुष समानतेला केवळ एक विचार म्हणून न मांडता, त्याला कायदेशीर आधार दिला. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळेच भारतीय समाजात स्त्रीच्या स्थानात अमुलाग्र बदल झाला. आजच्या आधुनिक भारतात महिलांना मिळालेले अनेक हक्क आणि संधी या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे खरे 'स्त्री मुक्तीदाता' आहेत. त्यांनी केवळ शब्दांनीच नव्हे, तर संविधानाच्या कलमांनी स्त्रीला कायद्याचे संरक्षण दिले. आज भारतीय स्त्री जी सन्मानाने जगत आहे, शिक्षण घेत आहे आणि देशाचे नेतृत्व करत आहे, त्यामागे बाबासाहेबांची दूरदृष्टी आहे. बाबासाहेब हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर स्त्री सक्षमीकरणाचे खरे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी केलेला संघर्ष आणि दिलेले अतुलनीय योगदान हे भारतीय समाजाच्या इतिहासात सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल.
Comments
Post a Comment